केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपळगांव ते टोलनाका या दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील दहा गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी खुटबाव, केडगाव, वरवंड अशा गावामध्ये यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. पिंपळगांव ते टोलनाका अशा 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी कुंपण अपघातास आमंत्रण देत आहे. रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात. नेहमीच हजारो वाहने या रस्तावरून जात येत असल्याने खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्डय़ामुळे व्यवस्थित पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्डात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे नागरिक, वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे.
संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करुन विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास थांबवावा. अनेक वेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु ही डागडुजीचे काम आठ दिवसाच्यांवर अद्याप टिकले नाही. काम केले तर उत्तम दर्जाचे व्हावे.
– शिवाजी वांझरे – ग्रामस्थ