लोणी काळभोर : हवेली तालुक्याचे वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास २०२२ मध्ये मान्यता मिळाली. यामुळे पूर्व हवेलीतील ४० हून अधिक गावांतील नागरिकांची महसुली कामे मार्गी लागणार असल्याने विविध गावचे सरपंच, संघटना, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, या कार्यालयात प्रशासकीय कामकाज सुरु करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासकीय अधिकारी नियुक्तीची मागणी विचारात घेऊन अप्पर तहसीलदार म्हणून अतिरिक्त कारभार हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. अप्पर तहसील कार्यालयाचा कारभार सुरू होणार असल्याने पूर्व हवेलीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
हवेली तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार मोठा आहे. तालुक्याचे वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अप्पर तहसिलदार लोणी काळभोर कार्यालयात प्रशासकीय कामकाज सुरु करण्यासाठी हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे अप्पर तहसीलदार पदाची तर हवेली तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक रामदास अनंता डामसे यांच्याकडे अप्पर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत सांभाळायचा आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय
हवेली तालुक्याची लोकसंख्या व अधिकाऱ्यांवर असलेला कामाचा बोजा लक्षात घेता शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी विधानसभेत पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी मागील वर्षी केली होती. हवेली तहसिल कार्यालयात दैनंदीन कामकाजासंदर्भात दर महिन्याला साधारणत: ८ ते ९ हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षापत्रिका मिळण्यासाठी दरमहा साधारणत: ४०० ते ५०० अर्ज प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरिक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: ६ हजार दाखले दिले जातात. वाढती लोकसंख्या, नागरीकरण, शहरीकरण या बाबी विचारात घेता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.