दीपक खिलारे/ इंदापूर ( पुणे ) : उजनी जलाशयामध्ये सध्या अत्यल्प असा सुमारे 29 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असताना, मत्स्य बीज सोडण्याचा खरंच फायदा होणार आहे का? असा सवाल करुन मच्छीमार बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचा तर हा प्रकार असल्याचे भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष तुषार खराडे यांनी सांगितले.
कुंभारगाव येथे उजनी धरणात मोठा गाजवाजा करून मत्स्य बीज सोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या संदर्भात तुषार खराडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी दहा वर्षाच्या कार्यकाळात तसेच त्यांच्याकडे मत्स्य खात्याचे राज्यमंत्रीपद असतानाही कधी मत्स्य बीज सोडले नाही. मात्र आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर उजनी जलाशयात मत्स्य बीज सोडण्याचा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून घेण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात धरणामध्ये फारसा पाणीसाठा राहणार नाही, त्यामुळे सोडलेल्या मत्स्य बीजांचा फायदा मच्छीमारांना होईल असे कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही, असे तुषार खराडे यांनी या संदर्भात नमूद केले.