नीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, वाल्हे-नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट शनिवार व रविवारी ३६ तास बंद राहणार असल्याचे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०९ रेल्वेफाटक शनिवारी (ता. १६) सकाळी ७ ते रविवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजेपर्यंत ३६ तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे रूळाच्या दुरूस्तीसाठी (रेल आणि स्लीपर बदलण्यासाठी) व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दरम्यान, ऐन गणेशोत्सवात मुंबई पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना पालखी महामार्गावरील रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, आता जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथून पुढील प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा प्रवाशांना पडणार आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसांत रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, रेल्वे प्रशासनावर प्रवाशी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.