पुणे : सोशल मीडियावर झालेली ओळख पुणेकर तरुणीला चांगलीच भोवली आहे. एका २२ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख करुन, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्यासह ९ जणांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते आजपर्यंत पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला आहे.
याबाबत मांजरी बुद्रुक येथील तरुणीने बुधवारी (ता. ७) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडील बाजीराव घुले, आई, दाजी मल्हार कुंजीर, मित्र समीर चौधरी, डॉ. टी. वाय. मोटे व डॉ. राजश्री मोटे व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये आरोपी आणि पीडित तरुणी यांची इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी तरुणीचे लपून न्यूड व्हिडिओ व फोटो काढले. फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.
एवढ्यावरच न थांबता, गर्भपात न केल्यास तुला उजनी धरणात फेकून मारुन टाकू… अशी धमकी दिली. यासाठी आरोपींनी मुलीला जबरदस्तीने उरळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी आरोपी डॉक्टरांनी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.