बारामती : बारामती एसटी स्टॅन्डवर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रडत बसलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला पोलिसांच्या मदतीने संकटातून सोडवले आहे. या संकटातून सोडवलेल्या तरुणाचे बारामतीसह परिसरात मोठे कौतुक केले जात आहे.
विजय कांबळे असे तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती बस स्थानकावर मुलगी रडत असल्याचे विजय कांबळे यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी मुलीची चौकशी केली असता, मुलीने तिला पुण्याला जायचे असल्याचे सांगितले. पैसे नसल्याने तिला पुढील प्रवास करता येत नव्हता. वाहनांना हात करून लिफ्ट घेण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु कोणतीच गाडी थांबली नसल्याचे मुलीने विजय यांना सांगितले.
मुलीला पैसे देतो असे सांगून विजय यांनी हॉटेल गार्गी येथे नेले. व मछिंद्र टिंगरे यांना फोनवर माहिती दिली. मछिंद्र टिंगरे यांनी थेट उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक महाडिया यांना कळविले. त्यानंतर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यानी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले.
आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चर्चा केली. यावेळी मुलगी मनातून प्रचंड दुखावल्याचे जाणवले. बारावीत शिकणाऱ्या मुलीचे वडिलांशी भांडण झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ती घर सोडून निघून आली होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्याशी बोलत विश्वासात घेतले. यावेळी मछिंद्र टिंगरे देखील तेथे पोचले. समयसूचकता दाखविताना एका मुलीला वाचविल्याबद्दल विजय कांबळे यांचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.