पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटामाटात निघाली आहे.
यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघाला आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला आहे.
दाक्षिणात्य पद्धतीची रचना हे यंदाच्या रथाचे वैशिष्टय आहे. संपूर्ण रथावर तब्बल 14 शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या 5 कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले आहेत.
यंदा दगडूशेठ गणपती गणेशोत्सव सांगता मिरवणूक घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी भाविकांनी मिळणार आहे. देश -परदेशातील भाविकांना देखील या सांगता मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा असते, मात्र, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होतेच असे नाही.
त्यामुळे यंदा संपुर्ण सांगता मिरवणूक ट्रस्टची वेबसाईट http://www.dagdushethganpati. com यावरून भाविकांना घरबसल्या लाईव्ह पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.