विजय लोखंडे
वाघोली : पुणे महापालिकेत समावेशानंतरही वाघोलीमध्ये ड्रेनेज लाइनची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे परिसरात नेहमीच स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना (उद्धव ठाकरे) शिरूर-हवेली विधानसभेचे निवडणूक समन्वयक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सहायक उपायुक्त सोमनाथ बनकर यांची भेट घेत ड्रेनेज लाइनची समस्या सोडविण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार बनकर यांनी वाघोली परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांची पाहणी करून ही समस्या तातडीने सोडविली जाईल, तसेच प्रस्तावीत ड्रेनेज लाइनच्या कामाच्या निविदा मंजूर केल्या जातील, असे आश्वासन दिले.
वाघोली परिसराचे नागरीकरण वेगाने होत असताना नागरी समस्यांही वाढत आहेत. यामध्ये ड्रेनेज लाइनची समस्या मोठी आहे. परिसरातील वाढते नागरिकण लक्षात घेता संपूर्ण परिसरात ड्रेनेज लाइनचे जाळे टाकणे, तसेच ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (एसटीपी) जोडणे, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाघोलीकरांकडून सातत्याने होत आहे, याबाबत महापालिकेकडे पाठपुरावाही करीत असल्याचे कटके यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सहायक उपायुक्तांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
याबाबत ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले की, महापालिकेकडे यापूर्वीही ड्रेनेज समस्या मांडली आहे. या भागात असंख्य गृहनिर्माण सोसायट्या बेधडकपणे बांधल्या गेल्या, ड्रेनेज लाइन अभावी उघड्यावर सांडपाणी सोडले आहे. काही ठिकाणी कुपनलिका, विहिरींचे पाणीही खराब झाले आहे. सदर गंभीर बाब सहायक उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
वाघोली परिसरातील ड्रेनेज लाइनच्या समस्या असलेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे. नागरिकांनीही अनेक समस्या मांडल्या, त्याची नोंद घेण्यात आली असून त्यानुसार या भागात ड्रेनेज लाइनचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, तसेच प्रस्तावित कामांच्या निविदाही मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
– सोमनाथ बनकर, सहायक उपायुक्त, मनपा पुणे