दौंड : येथील पूर्व भागातील महत्त्वाचे असलेले रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात लवकरच श्रेणीवर्धन होणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
राज्याचे विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची आमदार राहुल कुल यांनी मंत्रालयात भेट घेतली. दौंड तालुक्यातील रावणगाव येथील आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली. पुणे सोलापूर महामार्गावर असणारे रावणगाव हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आल्यास परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होईल. उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा गावात उपलब्ध होणार आहे.
नागरिकांना आरोग्य सेवेसाठी इतरत्र जाण्यासाठी खर्च व वेळ वाचेल. तसेच माफक दरात चांगली आरोग्य सेवा, सुविधा मिळतील. यासाठी जागा देखील उपलब्ध असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यामागणी नुसार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रावणगाव येथील आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश प्रशासनास दिले असल्याची माहिती यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिली.