हडपसर, ता. 29 : घरावर संकट असल्याने सोन्याचे दागीने मंतरुन देतो, अशी खोटी बतावणी करून एका भेंदूबाबाने महिलेच्या 3 लाख 20 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी भेंदूबाबाला अटक केली आहे. निलकंठ अण्णाराव सुर्यवंशी (वय 35, रा. आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. ही घटना हडपसर येथील मानकर दोसा जवळील रसवंती जवळ गुरुवारी (ता. 27) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका 44 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहते. फिर्यादी या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त हडपसरला आल्या होत्या. तेंव्हा आरोपी निलकंठ सुर्यवंशी हा सुद्धा तेथेच होता. आरोपीने फिर्यादी या एकट्याच असल्याचे हेरले. फिर्यादी यांना सांगितले की, त्यांच्या घरावर खूप मोठे संकट आहे. त्यामुळे तुमचे सोन्याचे दागीने मंतरुन देतो. अशी बतावणी करुन आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सोन्याचे दागिने मंतरून देण्याच्या बहाण्याने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची नजर चुकवुन आरोपी 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने घेवुन पसार झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी निलकंठ सुर्यवंशी याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318 (4),319 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच, हडपसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्याच्या मार्फत माहिती मिळवून आरोपीचा सुगावा काढला. आणि आरोपी निलकंठ सुर्यवंशी याला सापळा रचून मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.