पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे मेट्रो वेगवेगळ्या कारणांवरुन सतत चर्चेत आहे. पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होऊन त्याची ट्रायलदेखील पार पडली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारखा मिळत नसल्याने मेट्रो सुरु करण्यात अडचणी येत होत्या. या मार्गिकेचे आज अखेर उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा पुणे मेट्रो मार्ग आज दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११.३० वाजता कोलकाता येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे उद्घाटन करतील. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी या दोन मेट्रो गाड्या चालवणार आहोत, अशी माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल. दुपारी एकच्या सुमारास रुबी हॉलपूर्वी मेट्रो रामवाडीकडे रवाना होईल. रुबी हॉल ते रामवाडी हे अंतर साडेपाच किलोमीटर असून, उद्घाटनानंतर पुणे मेट्रो वनाझ ते रामवाडी हे १५.७ किलोमीटरचे अंतर पार करणारी लाइन २ पूर्ण करणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या पुणे मेट्रो मार्ग-१ कॉरिडॉरच्या निगडी विस्तारित भागाच्या कामाचेही उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले. हा कार्यक्रम पीसीएमसी मेट्रो स्थानकावर होणार आहे.
पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. मात्र, त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर लवकर ही मार्गिका सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सगळं काम तयार असूनही या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाला विलंब केला जात होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आक्रमक झाला होता आणि त्यांनी थेट मेट्रो कार्यालयाला घेराव घातला होता.