पुणे : पुणे शहर पोलीस दलातून धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. शहरातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसारत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी पहाटे लोहिया नगर पोलीस चौकीमध्ये घडली आहे. भरत दत्ता आस्मर असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, ही घटना पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकीमध्ये घडली आहे. आस्मर हे लोहिया नगर पोलीस चौकी येथे रात्रपाळी ड्युटीवर होते. पोलीस चौकीत कोणी नसताना एका खोलीमध्ये जाऊन दार लावून घेत त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. साधारणपणे आठ-दहा वर्षांपूर्वीच हा कर्मचारी पोलीस दलामध्ये भरती झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. थेट पोलीस चौकीमध्येच एखाद्या कर्मचाऱ्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.