पुणे : आपण भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करूया. भरपूर नफा होईल. फक्त त्यासाठी तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करावी लागेल, असे सांगत गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एका पोलीस निरीक्षकासह त्याच्या पत्नी आणि मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून ३१ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी प्रकाश आल्हाट, नवीन प्रकाश आल्हाट, नीता प्रकाश आल्हाट (सर्व रा. बिनावत टाऊनशीप, ससाणेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तुषार राजाराम सुर्वे (वय ३३, रा. धानोरी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी प्रकाश आल्हाट हे पोलीस निरीक्षक आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आल्हाट यांनी त्यांचा मुलगा नवीन आणि पत्नी नीता यांनी संगनमत केले. त्यांनी फिर्यादी तुषार यांना भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय करू असे आश्वासन दिले. आरंभ नावाचे त्यांचे हॉटेल आहे. या हॉटेलची जागा आणि कागदपत्रे नीता यांच्या नावावर आहेत. मात्र, ही माहिती फिर्यादी सुर्वे यांच्यापासून लपवून ठेवली आणि हॉटेल आरंभ हे सुर्वे आणि आल्हाट यांच्या भागीदारीत असल्याची बतावणी वारंवार करण्यात आली.
दरम्यान, हॉटेल व्यवसायामधून होणाऱ्या नफ्यामधील २५ टक्के वाटा देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले. सुर्वे यांच्याकडून व्यवसायातील गुंतवणूक म्हणून १२ लाख रुपये घेण्यात आले. त्याप्रमाणे खोट्या माहितीच्या आधारे भागीदारीचा समजुतीचा करारनामा केला. एवढेच नव्हे तर तो आरोपींनी स्वत:च्या ओळखीच्या वकिलांकडून नोटराईज्ड करून घेतला. हॉटेल सुरू झाल्यानंतर मात्र त्यांनी विविध कारणे द्यायला सुरुवात केली. आपण भागीदारी संपुष्टात आणू. गुंतवलेले पैसे बँकेच्या व्याजदराप्रमाणे परत करतो, असे तोंडी आश्वासन दिले. अशा प्रकारे त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
याबाबत सुर्वे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तपासावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.