नागपूर : नागपुराती सक्करदरा परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचे घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलासोबत सूत जुळले. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही मध्यप्रदेशात पळून गेले. मात्र, खिशातील पैसे संपले आणि दोघेही घराकडे परत आले. आईने दिलेल्या तक्रारीवरुन मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुलगी आठवीत शिक्षण घेत आहे. तिचे आईवडिल मोलमजुरी करतात. घराजवळील मुलाशी तिची ओळख झाली. यानंतर दोघेही एकमेकांशी बोलायला लागले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. दोघांचाही संपर्क वाढला. एप्रिल महिन्यांपासून सुरु असलेले प्रेमप्रकरण लग्नाच्या आणाभाका घेईपर्यंत पोहचले.
दरम्यान, मुलीचे आई-वडील गेल्यानंतर मुलगा तिच्या घरी जायला लागला. यादरम्यान, त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. डिसेंबर महिन्यांत मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. कुटुंबियांना माहिती झाल्यास खूप वाईट परिणाम होतील, याची भीती दोघांनाही होती. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. २९ डिसेंबरला दोघांनीही रेल्वेने मध्यप्रदेशातील भोपाळला पलायन केले होते.
तरुणाने कुटुंबियांचे काही पैसे चोरले होते. ते पैसे घेऊन त्याने मुलीला घेऊन पळ काढला. मात्र, आठ दिवसांतच त्याच्याकडील पैसे संपले. तसेच मुलाचे वय कमी असल्यामुळे त्याला कामावरही कुणी ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे दोघेही नागपुरमध्ये परत आले. तरुणी आपल्या घरी परतली असता तिच्या आईने सक्करदरा पोलीस ठाण्यात नेले. आरोपी प्रियकराविरुद्ध लेखी तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, प्रियकरसुद्धा अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसंरक्षणगृहात करण्यात आली आहे.