बापू मुळीक
पुणे: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वीर ता. पुरंदर येथील “श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी माता” यांचा पारंपारिक यात्रा उत्सव “ सवाई सर्जाच चांगभल करीत, गुलालाची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज सांगता झाली. श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा यात्रा उत्सव हळदीने सुरू होऊन देवाचे लग्न, पाणपूजन, भाकणूक ते रंगशिंपण (मारामारी) पर्यंत एकूण १३ दिवस चाललेली यात्रा मोठ्या भव्यतेने व परंपरा जपत पार पडली.
आज यात्रेचा मुख्य दिवस रंगशिंपण (मारामारी) यानिमित्त सर्व काठ्या पालख्या सर्व लवाजम्यासहित दुपारी १२ वाजता देऊळवाड्यात येऊन एक प्रदक्षिणा होऊन देवाला रंग लावण्यात आला. त्यानंतर मंदिरात दादा बुरुंगले व तात्या बुरुंगले यांच्या मार्फत भाकनुक होऊन दुपारी सर्व काठ्या पालख्यासोबत सर्व उपस्थित लवाजम्याला, भाविकांवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर बाहेरील बगाडाला मुळीक(मानकरी) याच्या हस्ते वीर व रिसेपिसे मानकरी मुळीक 3:15 वाजता यांच्या हस्ते बगाडाला धार पाडण्यात आली. रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांनी देऊळवाड्यात गर्दी केली होती.
सकाळपासूनच भाविकांची गर्दी व दर्शनबारी, पार्किंग, मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने पूर्व नियोजन केले होते. सर्व विश्वस्त मंडळ जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते. सोबतच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, कमांडो स्टाफ (शिल्ड सिक्युरिटी), वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी व पीएमपीएल बस सेवा, विद्युत विभाग, अनिरुद्धा डिझास्टर मेनेजमेंट, होमगार्ड, पोलीस मित्र, हाउसकीपिंग विभाग, गावातील कार्यरत सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट काम करीत आपली सेवा बजावली. संपूर्ण यात्रेत योग्य व्यवस्थापन, सर्व प्रशासकीय यंत्रणाची सांगड घालत सुव्यवस्थित नियोजन, सर्व धार्मिक विधी परंपरेने व तेवढेच भव्यतेने पार पाडण्यात आले.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त राजेंद्र धुमाळ, अमोल धुमाळ, सुनील धुमाळ, काशिनाथ धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनवणे, प्रमिला देशमुख, अलका जाधव, तसेच सर्व सल्लागार मंडळी यांनी सर्व यंत्रणांचे आभार मानून यापुढेही सहकार्य राहावे अशी विनंती केली आहे.
चालू वर्षाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याकरिता सहकार्य केलेल्या सर्व शासकीय निमशासकीय यंत्रणा, तसेच कोडीत, कन्हेरी, वाई, सोनवडी, राजेवाडी, भोंडवेवाडी, कसबा(पुणे) वीर पालखी, सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार, ग्रामस्थ तसेच श्रीनाथांच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक, देणगीदार, ज्ञात-अज्ञात सर्वांनीच मोलाचे सहकार्य केल्याने यात्रा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांचे आभार,
– राजेंद्र धुमाळ (मुख्य विश्वस्त) श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट. वीर