पुणे: पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने ७० वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवले आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून वृद्धाचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिले आहे. २४ फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका सोहळ्यात जेवताना त्यांनी चुकून हाड गिळल्याने ते अन्ननलिकेत अडकले होते. त्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडून मोठी दुखापत झाली होती. हाड वृद्धाच्या अन्ननलिकेत अडकले, ज्यामुळे तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. इंदापूर येथील स्थानिक रुग्णालयात नेऊनही चांगले उपचार मिळाले नाहीत आणि अखेर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात रेफर करण्यात आले.
डॉक्टरांनी हाड काढण्यासाठी केला एंडोस्कोपीचा वापर
डॉ. पद्मसेन रानबागळे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने हाड शोधण्यासाठी सीटी स्कॅन केले हाडाची अचूक स्थिती कळल्यानंतर एंडोस्कोपीचा वापर केला आणि रुग्णाच्या अन्ननलिकेतून यशस्वीरित्या हाड काढले. हाड ५.३ सेमी बाय ३ सेमी आकाराचे होते आणि अन्ननलिकेत धोकादायक ठिकाणी अडकले होते.
शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी हाडामुळे अन्ननलिकेत झालेल्या छिद्राची दुरुस्ती करण्यासाठी एक स्टेंटही लावला. जखम पूर्णपणे बरी होईपर्यंत स्टेंट सहा महिने तिथेच राहील.
रुग्णाची प्रकृती सुधारत आहे आणि दुसऱ्या दिवशी रुग्ण पाणी पिऊ शकला. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती आणि रुग्णाचे वय आणि हाडाचे स्थान लक्षात घेता डॉक्टरांना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागली.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेचे कौतुक केले आणि हा एक चमत्कार असल्याचे म्हटले. “रुग्णाचे वय, हाडाचे स्थान आणि संभाव्य जोखीम यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती,” असे डॉ. पद्मसेन रानबगळे म्हणाले. “रुग्ण बरा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे.”
कान नाक घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल ठाकूर, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर यांच्या टिमने हि आवाहनात्मक कामगिरी करून दाखवली आहे.