पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पर्वती पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. उर्वरित पाच जण पसार झाले. या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जनता वसाहतकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ सोमवारी (दि.3) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास केली.
बसवराज उर्फ अभिषेक उर्फ माया राजेंद्र पाटील (वय-19 रा. गल्ली नं. 15, जनता वसाहत, पुणे), अमित शंकर कांदे (वय-27 रा. गल्ली नं. 18, जनता वसाहत, पुणे) यांना अटक करुन एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ओंकार उर्फ दाद्या वामन आल्हाट (रा. दांडेकर पुल, पुणे मुळ रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर), प्रमोद अंकुश कळंबे (रा. पर्वती दर्शन), अमन झारेकरी (रा. दांडेकर पुल, पुणे), पृथ्वीराज कांबळे (रा. गल्ली नं.3 संतोषनगर, कात्रज) यांच्यावर आयपीसी 399, 402, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल बबन दबडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याविषयाबाबत पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, कॅनॉल रोडवरील जनता वसाहतकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर काही तरुण हातात कोयते घेऊन दरोडा टाकणार आहे. त्यावेळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पाचजण जवळ असलेला कोयता घेऊन पसार झाले. तर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पुल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे आरोपींनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.