उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक कै. रामदास आखाडे यांच्या स्मरणार्थ जावजी बुवाचीवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळेला पावणे दोन लाखांचा ”आर ओ प्लान्ट” प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भेट स्वरुपात गुरुवारी (ता .२६) देण्यात आला आहे.
सलाम करा या तिरंग्याला, जी तुमची शान आहे. मान नेहमी उंच ठेवा, जोपर्यत तुमच्यात प्राण आहे. अशा विविध प्रकारच्या देशभक्तीपर घोषणा देऊन अतिशय उत्साही वातावरणात भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन जावजी बुवाचीवाडी जि. प. शाळा येथे साजरा करण्यात आला.
यावेळी कासुर्डी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व कासुर्डी विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी त्यांचे भाऊ हॉटेल गारवाचे मालक कै. रामदास आखाडे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्धीकरणाचा आर.ओ. प्लान्ट भेट दिला आहे.
प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आनंदी जीवन फाउंडेशनचे संचालक डॉ. मोहसिन पठाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करून विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. त्यात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेस आर्थिक रूपात मदत केली. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला होता.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आतार मॅडम यांनी केले. तर सुत्रसंचालन शिक्षिका अनिता क्षीरसागर यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी सहकारी शिक्षिका लोखंडे सुतार, डोईफोडे व अंगणवाडी सेविका अनिता सोनवणे, मदतनीस वैशाली सोनवणे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितिन राजवडे, पोलिस पाटील तुकाराम कोडितकर, संतोष आखाडे, नामदेव राजवडे, बाळासाहेब राजवडे, उत्तम चव्हाण, राजेंद्र आखाडे, धनाजी कोडितकर, दत्तात्रय आखाडे, रोहिदास आखाडे, उत्तम राजवडे, विशाल राजवडे, मयूर आखाडे व युवकवर्ग व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.