पुणे : पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला जाणार आहे. तो आता पुणे-शिर्डी-नाशिक असा तयार केला जात आहे. त्यामुळे जो आधी पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग 235 किलोमीटरचा होता. तो आता 33 किलोमीटरने वाढला आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे-नाशिक ही दोन महत्वाची शहरे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, तो आता थोडा लांबला आहे.
पुणे-नाशिक हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली आहे. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नुकतीच त्यासाठी 2500 कोटींच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे.
बदल करण्यामोगचे कारण फडणवीस यांनी सांगितले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत रेल्वमंत्र्यांशी चर्चा केली. सध्या हा मार्ग 235 किलोमीटरचा आहे. विद्यामान मार्गावर एकूण 20 स्टेशन, 18 बोगदे आणि 19 उड्डाण पूल आहेत. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होणार होती. यामुळे पुणे-शिर्डी-नाशिक असा पर्याय तयार केला जात आहे. आता रेल्वेमार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा मार्ग बदलाणार असल्यामुळे त्याचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे.
या मार्गाचा फायदा नाशिक, पुणे शहरासोबत शिर्डी शहरादेखील होणार आहे. यामुळे या नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक अंतर दोन तासांत गाठणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.