पुणे : पुणे शहरात डेंग्यूचे आणि झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यावेळी पालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी शहरात झिकाच्या बाधित रुग्णांची एकूण संख्या 47 इतकी झाली आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या दोन ज्येष्ठांचा मृत्यू देखील झाला आहे. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती त्यांचे मृत्यू परीक्षण करणार आहे. पुण्यात झिकाचे सर्वाधिक 11 रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील आहेत.
राज्यसरकारकडून झिका व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरस आढळून आलेल्या जिल्ह्यात विशेष वैद्यकीय कक्ष उभारले जात आहेत. ताप आढळून आलेल्या किंवा गर्भवती महिलेला काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी केली जात आहे. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पुणेकरांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. झिका आजारामुळे फार मोठा गंभीर परिणाम होत नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. पण नागरिकांनी काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. तसेच योग्यवेळी उपचार करणं देखील जास्त आवश्यत आहे.
काय काळजी घ्याल?
झिका हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा एडिस डासांद्वारे पसरतो. या आजारात रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोणताही ताप अंगावर काढू नये. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात दाखवावे. घरातील पाणी साठे वाहते करावेत. साठवलेल्या पाण्यांची भांडी कापडाने झाकून घ्यावीत. पाणी रिकामे करता येणार नाही अशा साठ्यांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. मच्छरदाणीचा वापर करावा. दिवसा पूर्ण कपड्यांत राहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण तयार करू नये.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. तसेच एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.