पुणे : नववर्ष सुखाचे जावे यासाठी भाविक वर्षाच्या प्रारंभी मंदिरात जाऊन मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. आज लाखो भाविकांनी मंदिरात देवदर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पहायला मिळत आहेत. पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात आले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अंबाबाई मंदिरात कोल्हापुरकरांची अलोट गर्दी
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात आले आहेत. पर्यटकांसोबतच स्थानिक भाविकांनी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. अंबाबाई मंदिराची दर्शन रांग हाउसफुल झाली आहे.
विठ्ठल मंदिर गजबजले
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळा-फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. जरबेरा, गुलाब, शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल, पिवळ्या, गुलाबी अशा विविध आकर्षक फुलांनी तसेच डाळिंब, अननस, केळी, संत्री, मोसंबी अशा फळांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी, चार खांबी तसेच सभामंडप आणि मंदिरातील विविध भागांना आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
नांदेडचे गुरुद्वारा भाविकांच्या गर्दीने फुलले
नांदेडमधील जगप्रसिद्ध गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नांदेडमधील गुरुद्वारा हे शीख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. जगभरातील शीख धर्मियांचे पवित्र धर्मस्थळ असणाऱ्या हुजूर साहिब नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा इथं नववर्षानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात गुरुद्वारामध्ये जात माथा टेकवत केली आहे.