पुणे : आपल्या घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याच्या संशयातून मुलाने आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडकी भागातील रेंज हिल परिसरात रविवारी घडली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आईचा खून करून पसार झालेल्या मुलाला शिर्डी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईचा खून करून पसार झालेल्या ज्ञानेश्वरला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले.
गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंफाबाई मूळच्या श्रीरामपूर परिसरातील मुठे वडगावातील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ज्ञानेश्वर खडकीत राहायला असून, तो दारूगोळा कारखान्यात कामाला आहे. दुसरा मुलगा देहूरोड परिसरात राहायला आहे. शनिवारी त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वरचा घटस्फोट झाला आहे. तो एकटाच राहायला आहे. घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचा संशय त्याला होता. शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या गुंफाबाईचा गळा ज्ञानेश्वरने चाकूने गळा चिरून खून केला. त्यानंतर तो घराला कुलुप लावून पसार झाला.
दरम्यान, रविवारी सकाळी गुंफाबाईच्या नातेवाईकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने संशय आला. त्यामुळे नातेवाईकांनी देहूरोड परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वरच्या भावाशी संपर्क साधला. त्यानंतर ज्ञानेश्वरचा भाऊ रविवारी सकाळी खडकीतील घरी आला. तेव्हा घराबाहेर आईची चप्पल होती. मात्र, घराला बाहेरून कुलुप होते. त्याने खिडकी उघडून पाहिले असता, आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती त्याने पोलिसांनी कळविली. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुंफाबाई यांच्या अंगावर दागिने होते. मात्र, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर घरात नव्हता. त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याने संशय बळावला. तांत्रिक तपासात तो पसार झाल्याचे लक्षात आले. तो शिर्डीतील पुणेतांबे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खडकी पोलिसांचे पथक रवाना झाले. पुणतांबे परिसरातून त्याला सायंकाळी ताब्यात घेण्यात आले.