पुणे : पुण्यात सध्या डासांच्या वादळाने दहशत निर्माण केली आहे. पुण्याच्या मुठा नदी परिसरात हे डासांचे वादळ घोंगावताना दिसले आणि त्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात डास कधीच एकत्र आले नव्हते. पुण्यातील केशवनगर खराडीजवळील मुठा नदीवरील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. नदीपात्रातील डासांसारख्या कीटकांच्या या थव्यांवर आता ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. या औषध फवारणीमुळे कीटकांच्या प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
मुठा नदीकिनारी वसलेल्या टोलजंग इमारतींवर डासांचे भलेमोठे वादळ घोंगावताना व्हिडीओमध्ये दिसल्यानंतर पुणेकरांना भिती व्यक्त केली. लाखो डास एकाच वेळी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरले आहेत. हे दृश्य पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे. यामुळेच महापालिकेने औषध फवारणीचा निर्णय घेतला आहे.
नदीपात्रातील वाढत्या जलपर्णीमुळे शहरात कीटकांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत विविध भागात औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार हवेतील कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठालगतच्या परिसरात औषध फवारणी केली जाणार आहे.