पुणे : पुण्यातील संभाजी पोलीस चौकीच्या मागील बाजूस नदीपात्राला लागून असलेल्या जागेत नियमबाह्य पद्धतीने तीन होर्डिंगचे एकत्रीकरण करून मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. हे बहुचर्चित होर्डिंग अखेर महापालिका प्रशासनाने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन करून हे होर्डिंग उभारले होते. चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या या होर्डिंगला परवाना दिल्याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने महापालिकेकडून अधिकृत परवान्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष होते. अखेर महापालिका प्रशासनाने हे होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी दिली.
तीन होर्डिंगचे एकत्रीकरण करून मोठे होर्डिंग उभारले होते. हे होर्डिंग नियमानुसार उभारलेले नव्हते. याबाबतची पाहणी करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत परवाना निरीक्षकांवर कायद्याचा बडगा उगारला होता. दरम्यान, संपूर्ण माहिती घेतल्यानंतर ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे समोर आले होते. त्यामुळे होर्डिंग उभारताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील फसवणूक करण्यात आली होती का, की सर्व माहिती असून देखील व्यावसायिकाच्या हितासाठी या जागेवर परवाना देण्यात आला होता, अशी चर्चा रंगली होती. होर्डिंग उभे करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर होर्डिंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.
होर्डिंग व्यावसायिकाने ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा केला होता; पण महापालिकेच्या तपासणीमध्ये ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तरीही क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित होर्डिंग व्यावसायिकाला ११ महिने मुदतीने जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरु करण्यात आली होती. मात्र, हे होर्डिंगच काढून टाकण्याणार असल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले की, होर्डिंग बेकायदा उभारण्यात आले होते. त्याबाबतची पूर्ण माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढली. परवाना मागण्याचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. होर्डिंगची जागा महापालिकेची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता थेट हे होर्डिंग काढले जाणार आहेत.