पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांमधील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरवात झाली आहे. दरम्यान, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा’ अशा आशयाचा मजकूर समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केला आहे. गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी याला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी या कारणावरून आमने-सामने आले आहेत.
पुण्यात महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. याचवेळी धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत.
काँग्रेस उमेदवाराचा त्यांच्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच त्यांच्यावर भाजप नेत्यांची छायाचित्रे वापरण्याची वेळ आल्याची टीका गौरव बापट यांनी केली. बापट म्हणाले की, यावरून कॉंग्रेसची पराभवाची मानसिकता दिसून येत आहे. स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच नेत्यांवर विश्वास असता, तर अशा पद्धतीचे बालीश चाळे झाले नसते. भाजपचे चारशेहून अधिक खासदार निवडून येतील. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळही मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे यापुढे जोमाने प्रचार केला जाईल, असेही बापट यांनी सांगितले.
याबाबत स्पष्टीकरण देताना कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्या अधिकृत समाजमाध्यमातून छायाचित्र असलेला मजकूर प्रसारित झालेला नाही. दिवंगत खासदार गिरीश बापट सर्वांचे होते. कार्यकर्त्यांनी तशा आशयाचा मजकूर टाकला असेल आणि त्यांची तशी भावना असेल तर त्यामध्ये गैर काही नाही, असे मला वाटते.