पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वडिलांकडून पैसे आणून न दिल्याने विवाहितेचा ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान घडला आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिचा पती (वय ३१), सासु (वय ५६), सासरे (वय ६०), नंणद (वय ३९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सध्या त्यांच्या माहेरी रहात आहेत. त्या पती याच्यासह राहत होत्या. त्यांचे पती, सासु, सासरे, नणंद यांनी त्यांच्या वडिलांकडून आरोपी यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले नाही. या कारणावरुन फिर्यादी यांचा शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन फिर्यादी यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
फिर्यादीचे पती व नणंद यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचा ओढणीने गळा आवळला. फिर्यादी यांनी आपली सुटका करुन माहेरी गेल्या. याप्रकरणी फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.