पुणे : लग्न कुठलेही असो मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, अनेक लग्न सोहळे आपण पाहिले असतील. मात्र, एका हटके लग्न सोहळ्याची सध्या चर्चा सुरू आहे. लग्न सोहळा पार पडताना एक करार करण्यात आला. या करारामध्ये सहा प्रश्न ठेवण्यात आले होते. ते मान्य झाल्यानंतर हा विवाह पार पडला.
विशेष म्हणजे या करारनाम्यवर साक्षीदार म्हणून त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींनी सह्या देखील केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हा विवाह केला आहे. या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.
आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे आणि जुन्नर तालुक्यातील सायली ताजने यांचा मंचर येथे विवाह सोहळा पार पडला आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखाचा क्षण असतो. विशेष म्हणजे नवरदेव आणि नवरीने एकमेकांसमोर सहा वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे सर्वानाच या लग्न सोहळ्याचे कौतुक वाटले.
लग्नानंतर मुलगा आणि मुलगी या दोघांचेही नवीन आयुष्याची सुरुवात असते. यात दोघेही आपल्या संसाराविषयी स्वप्न पाहत असतात. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांना तेवढंच समजून घेणे महत्त्वाचे असते. जसा काळ बदलत आहे तशी लग्न करण्याची पद्धत देखील बदलत चालली आहे. त्यातील एक बदल म्हणजे पुणे जिल्ह्यात पार पडलेला विवाह सोहळा होय.