पुणे : काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. या सर्व प्रकरणावर वसंत मोरे यांनी थेट मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरे यांनी पक्षातील अंतर्गत मतभेदांना कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी साईनाथ बाबर आणि मोरे यांच्यातील संघर्ष चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीमार्गे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसे आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे.
या प्रकरणानंतर सोशल मीडिया मनसे पदाधिकाऱ्यांबाबत सोशल मीडियावर वसंत मोरे यांच्या समर्थकांनी अपमान जनक भाषा वापरल्याने मनसेने मोरेंच्या समर्थकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच साईनाथ बाबर यांनीदेखील वसंत मोरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत धमकी देणारी व्यक्ती ही त्यांच्याशीच संबंधित असू शकते असा दावा बाबर यांनी केला आहे.
साईनाथ बाबर यांच पोलीस आयुक्तांना पत्र ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात एक पोस्ट केली होती. या पोस्टवर आलेल्या कमेंटनुसार वसंत मोरे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. तर पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. यामुळे चिडलेल्या वसंत मोरेंनी हे काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका फोन कॉलवरून पोलिसांकडे तक्रार केली असून ते हेतूपरस्पर आरोप करीत आहेत, असं पत्र साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना दिल आहे.
तसेच ही बाब अत्यंत गंभीर असून फोन कॉल करणारी व्यक्ती वसंत मोरेंशी संबंधित असण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे सबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करावा. यातील आरोपी जर यांच्याशीच संबंधित असेल तर वसंत मोरेंविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणीही साईनाथ बाबर यांनी केली आहे.