प्रतिनिधी- विजय लोखंडे
वाघोली : लोहगाव-वाघोली रोडवरील कर्मभूमी नगर, योजना नगर तसेच एअरपोर्ट जवळील खेसे पार्क, साठेवस्ती यासह लोहगाव-वाघोली परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे-नगर महामार्गासह वाघोली-लोहगाव मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांना पुराचे स्वरूप आले आहे. तात्काळ नैसर्गिक ओढे, नाले खुले करून रस्त्याच्या मार्गातील उतार, रस्त्यातील मध्यभागी लवण, आदी वाघोली-लोहगाव रस्त्याच्या समस्यांचे योग्य नियोजन करावे. मात्र याकडे गेले अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याची माहिती वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नगर महामार्ग, वाघोली-लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने पर्यायाने पाणी रस्त्यांवरून प्रचंड वाहत आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक अडकून पडत आहेत. वाहनचालक या पाण्यामध्ये वाहने घेऊन जाण्यासाठी घाबरत असल्याने वाहतूक ठप्प होत असून दुचाकी, चारचाकी वाहने बंद पडत आहेत.
नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधकामे झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याची ओरड नागरिकांमधून केली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशावरील नैसर्गिक ओढे, नाले खुले करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचे राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात कामावरून सुटल्यानंतर दुचाकी वरून लोहगाव वरून वाघोलीमार्गे घरी जाताना वाघोली-लोहगाव रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याप्रसंगी जीव मुठीत घेऊन मी वाहन चालवीत होतो. माझी दुचाकी वाहत असलेल्या पाण्यात मध्येच बंद पडली. माझी दुचाकी मी कशीबशी जीव पणाला लावून बाहेर काढली तर तासभर दुचाकी गाडी सुरु झाली नाही. पावसाळ्याच्या पूर्वीच प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून योग्य नियोजन करणे गरजेचे होते.
– मारुती ठवरे, दुचाकी वाहनचालक