पुणे : बँकेपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभियंत्याची 1 कोटी 10 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर परिसरात घडली आहे. तसेच गुंतवलेले पैसे मागितल्यानंतर अभियंत्यासह त्याचा कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मिकांत नथुराम त्रिवेदी (रा. 301, भारत श्री, एरंडवणे पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर आप्पासो दत्तात्रय शेंडगे (वय 56, आनंदनगर, सिंहगडरोड, पुणे मुळ रा. हातनूर ता. तासगाव जि. सांगली) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. सदर प्रकार हा सन 2020 साली घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पासो शेंडगे हे एक अभियंता आहेत. शेंडगे यांनी मलेशीया ट्रान्सफार्मर मॅन्युफक्चरींग कंपनी मध्ये डिझायन कन्सलटंट म्हणून काम केले आहे. कंपनीशी कॉन्ट्रक्ट संपल्यानंतर शेंडगे सन 2020 साली पुन्हा पुण्यात राहण्यासाठी आले. तेव्हा शेंडगे यांच्या एका मित्राने आरोपी लक्ष्मीकांत त्रिवेदी यांची ओळख करून दिली. त्यानंतर फिर्यादी व आरोपींच्या सारख्या गाठीभेटी होत होत्या.
एके दिवशी लक्ष्मीकांत त्रिवेदी यांनी शेंडगे यांना विकर्ष स्टॅम्पींग इंडीया प्रा.लि. या कंपनीत पैसे गुंतवणूक करा. बँकेपेक्षा जास्त प्रमाणात नफा मिळवुन देतो. गुंतवणुकीच्या रक्कमेवर 30 टक्के परतावा मिळवून देतो. असे आमिष दाखविले. आणि या आमिषाला फिर्यादी शेंडगे बळी पडले. फिर्यादी यांनी त्रिवेदी यांना वेळोवेळी चेकद्वारे 81 लाख रुपये दिले. तर रोख स्वरूपाय 29 लाख 50 हजार रुपये दिले. असे मिळून फिर्यादी शेंडगे यांनी आरोपी त्रिवेदी यांना 1 कोटी 10 लाख 50 हजार रुपये दिले आहे. तसेच याबाबत फिर्यादी व आरोपींमध्ये वचनचिठ्ठी देखील झाली आहे.
दरम्यान, गुंतवलेले पैसे व त्यावरील कोणताही परतावा न दिल्याने शेंडगे यांनी त्रिवेदी यांना वारंवार फोन केला. मात्र आरोपी त्रिवेदी यांनी टाळाटाळ करुन नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच आरोपी त्रिवेदी याने दिलेले सर्व चेक बाउन्स झालेले आहे. त्यानंतर फिर्यादी शेंडगे व त्यांचा मित्र पुन्हा चेक मागण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी त्रिवेदी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी शेंडगे यांना आरोपी लक्ष्मिकांत त्रिवेदी यांनी पैसे गुंतवण्यास भाग पाडुन कोणताही परतावा अथया मुळ गुंतवणुक रक्कम परत दिलेली नाही. त्यामुळे त्रिवेदी यांनी आपली आर्थिक फसवणूक केली आहे. हे लक्षात आल्यानंतर शेंडगे यांनी तत्काळ सिंहगड रोड पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपी लक्ष्मिकांत त्रिवेदी यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी त्रिवेदी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे करीत आहेत.