पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लष्कराच्या ‘कमांड हॉस्पिटल’मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल ४० तरुणांची २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार २१ डिसेंबर २०२१ ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत गंगाधाम सोसायटी आणि मार्केट यार्ड येथील सार्वजनिक रस्त्यावर घडला.
याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात ५३ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला कोंढवा पोलिसांनी ‘मिलिटरी इंटेलिजन्स’च्या मदतीने अशाच एका प्रकरणात अटक केली आहे. विनायक तुकाराम कडाळे (वय ५३, रा. फेज दोन, गंगाधाम, मार्केट यार्ड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य तानाजी गांधीले (वय २२, रा. कीर्तनबाग, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक कडाळे हा लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमधून लेखापाल (अकाऊंटंट-सिव्हिल सर्व्हिस) या पदावरून निवृत्त झालेला आहे. त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आरोपी विनायक कडाळे आणि फिर्यादी यांची ओळख होती. आरोपीने गांधिले यांची भेट घेतली. ‘कमांड हॉस्पिटल’ येथे त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी स्वतःच्या नावे असलेले भारत सरकारच्या सुरक्षा विभागाचे (मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स) पत्र दाखवले.
शासनाचे खोटे पत्र दाखवत फिर्यादीसह इतरांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या पदांसाठी ६० हजार ते ७५ हजार रुपये त्याने उकळले. अशा प्रकारे ४० तरुणांच्या नावाने २८ लाख रुपये त्याने स्वत:च्या खात्यावर घेतले. ऋषिकेश शिवाजी गांधीले (रा. वडगाव घेनंद, ता. खेड), शुभम प्रवीण गांधीले यांच्यासह अन्य ४० व्यक्तींची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, विनायक कडाळे आणि त्याची पत्नी दीपाली हिच्यावर लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी लुल्लानगर येथे कारवाई करीत बेड्या ठोकल्या. कडाळे सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला मार्केट यार्ड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शितल जाधव करीत आहेत.