पुणे : बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरायला आलेल्या प्रेमी युगलाला मारहाण करून गळ्यातील १ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील फिर्यादी तरुण आपल्या मैत्रिणीबरोबर मोटारसायकलवरुन फिरायला बोपदेव घाटात गेले होते. ते टेबल पॉईंट येथे थांबले. त्यानंतर माघारी निघाले असताना मोटारसायकलवरुन दोघे जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या मोटारसायकलसमोर गाडी आडवी लावली.
त्यानंतर फिर्यादी तरुणाला हाताने मारहाण करुन त्याच्या गळ्यातील १ तोळ्याची सोनसाखळी सुमारे ५० हजार रुपयांची जबरदस्तीने हिसकावून घेतली. आणि दोन्ही चोरटे त्या ठिकाणाहून फरार झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.
दरम्यान, बोपदेव घाटात प्रेमी युगलांना मारहाण करुन लुटण्याचे अनेक प्रकार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका टोळीला पकडले. त्यानंतरही रविवारी भर दुपारी एका युगलाला मारहाण करुन लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.