लोणी काळभोर : चुलत भावांना शाळेत सोडविण्यासाठी काकांच्या दुचाकीवरून आलेला 3 वर्षाचा चिमुकला हरवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र लोणी काळभोर येथील दोन तरुणांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चिमुकल्याला लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने त्याच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. त्यामुळे दोन तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वराज संदीप शिंदे (वय-3, रा. एमआयटी कॉलेज जवळ लोणी स्टेशन, ता. हवेली) असे पालकांच्याकडे स्वाधीन केलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर मनीष सीरवी (वय-२५) व अरबाज मणियार (वय-२२, दोघेही रा. लोणी काळभोर) असे सतर्कता दाखविणाऱ्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराजचे चुलतभाऊ हे लोणी काळभोर येथील एका शाळेत शिक्षण घेत आहेत. स्वराजचे काका मुलांना शाळेत सोडविण्यासाठी दररोज जात होते. मंगळवारी, स्वराजचे काका नेहमीप्रमाणे मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडविण्यासाठी चालले होते. तेव्हा स्वराज काकांच्या पाठीमागे लागले होते. तेव्हा काकांनी स्वराजलाही गाडीवर घेतले. आणि मुलांना शाळेत सोडविण्यासाठी गेले.
मुलांना शाळेत सोडवीत असताना, स्वराजचा हात सटकला. आणि स्वराज गर्दीत गायब झाला. तेव्हा काकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, काकांचा हात सुटल्यानंतर स्वराज हा पाषाणकर बागेच्या परिसरातील रस्त्याने रडत रडत चालला होता. तेव्हा त्याच्यावर मनीष सीरवी व अरबाज मणियार या दोन तरुणांची नजर पडली. दोन्ही तरुणांनी स्वराजला विश्वासात घेऊन त्याची माहिती विचारली. मात्र त्याला काहीच सांगता आले नाही. त्यानंतर दोन्ही तरुणांनी स्वराजला पोलिसांच्या ताब्यात दिले.
लोणी काळभोर पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलाचा फोटो त्याच्या माहितीसह व्हाटसअॅप या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून सर्वत्र पाठवली. त्यानंतर एका तासाच्या आत मुलाचे आईवडील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी शहानिशा करून मुलाला पालकांकडे स्वाधीन केले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, संदीप जोगदंड, शिवाजी दरेकर व संदीप धुमाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, उरुळी कांचन येथून कल्प हुसेन खान हा 3 वर्षाचा चिमुकला सोमवारी (ता. 15) सायंकाळी हरवला होता. उरुळी कांचन येथील तरुणांनी पोलिसांच्या मदतीने कल्पला त्याच्या आईवडिलांच्याकडे स्वाधीन केले होते. त्यातच, आज लोणी काळभोर येथे स्वराज शिंदे हा चिमुकला हरवला होता. यावेळी दोन तरुणानी दाखविलेल्या सतर्कतेमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने चिमुकल्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. लहान मुले हरवण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालकांनो आता मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.