पुणे : पेरणे (ता. हवेली) येथील राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब नारायण जाधव यांनी त्यांच्याच शाळेतील शिक्षेकेला शिवीगाळ करत, हेल्मेट फेकून मारले आणि निलंबीत करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्षिकेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी मुख्याध्यापकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका पेरणे येथील राधाकृष्ण विद्यालयात मागील दोन महिन्यांपासून नोकरी करते. बुधवारी (ता. २८) सकाळी १० वाजता शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव हे प्रशालेमध्ये त्यांची खासगी दुचाकी चार्जिंग करत असताना, संबंधित शिक्षेकेने त्यांना प्रशालेमध्ये खासगी गाडी चार्जिंग करु नका, असे सांगितले. याचा राग आल्याने मुख्याध्यापकाने शिक्षेकेस शिवीगाळ करत, अंगावर धावून गेले. तसेच शिक्षिकेला हेल्मेट फेकून मारले. सुदैवाने शिक्षिका बाजूला झाल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला निलंबीत करण्याची व पोलीस ठाण्यात तुझी तक्रार करतो, अशी धमकी देखील दिल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शिक्षेकेच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव (रा. चाकण, तळेगाव दाभाडे चौक, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.