पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. किरकोळ कारणावरून गंभीर मारहाणीचे गुन्हे घडत आहेत. हडपसर परिसरात अशीच एक घटना उघडकीला आली आहे. उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याने चार जणांनी टपरी चालकाला काठीने व दगडाने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
मारहाणीचा प्रकार शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथील पावर हाऊस समोर घडला. याबाबत वसीम युनुस मुजावर (वय-२४, रा. शिंदे वस्ती, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिवेश चव्हाण, शेखर यादव, राहुल चव्हाण, यश चव्हाण (सर्व रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन राहुल चव्हाण व यश चव्हाण यांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ यांची हडपसर येतील शिंदे वस्ती येथील पावर हाऊससमोर पानटपरी आहे. येथे आरोपी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पानटपरीवर आले. त्यांनी उधारीवर सिगारेट मागितली. मात्र, फिर्यादी यांनी उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी यांना अंधारात डोक्यात दगड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केली. याबाबत वसीम याने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे करीत आहेत.