पुणे : मावळ तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या रोहित जाधव या भूकरमापकाला आणि त्यांच्या सहाय्यकांना गुरुवारी जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिरगावजवळील गोडुंबरे येथे मोजणीचे काम करत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने केली आहे.
नेमकं काय घडलं?
एका मालमतेची मोजणी करण्यासाठी रोहित जाधव व त्यांचे सहाय्यक गुरुवारी (दि. १०) गोडुंबरे येथे गेले होते. तेथे अर्जदाराने दाखविलेल्या जागेचा पंचनामा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याचवेळी १० ते १५ लोकांच्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक करून कामात अडथळे आणले. तसेच त्यांना लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण केली.
सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जाधव यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात या जमावाविरुद्ध फिर्याद दाखल केली असल्याचे संघटनेचे खजिनदार विनायक वाघचवरे यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक अनिल माने व अतिरिक्त आयुक्त आनंद भंडारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.