दौंड : जावजीबुवाची ते होलेवस्ती ( बोरीऐंदी) हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा (दि. 15 सप्टेंबर) रोजी आमरण उपोषणाचा इशारा दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला धडक मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. जावजीबुवाची ते होलेवस्ती (बोरीऐंदी) रस्त्याची व मुळामुठा कालव्यावरील पूल दुरुस्ती व्हावी याबाबत निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सारिका भुजबळ व पदाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
अनेक वर्षापासून जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने येण्याजाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दक्षिणेच्या बाजूकडील अनेक गावांना जोडणारा हा जवळचा पर्याय रस्ता असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. पुढील पंधरा दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बोरीऐंदी, कासुर्डी, यांसह परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, दौंड येथे मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढून 15 सप्टेंबर रोजी निदर्शने करून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .