पुणे : गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा… पोलिसांतील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… या ओळींची प्रचिती नुकतीच पुण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे सात तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरले. पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा माग काढला आणि संबंधित महिलेला दागिने परत मिळवून दिले.
नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून प्राजक्ता सचिन महाडिक (वय ४०) या पुण्यात आल्या होत्या. विवाह समारंभ आटोपून त्या कुटुंबीयांसोबत रिक्षातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. गडबडीत त्या दागिने ठेवलेली पिशवी रिक्षात विसरल्या. घाबरलेल्या महाडिक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दागिने गहाळ झाल्याची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांना दिली.
दरम्यान, पोलीस हवालदार प्रवीण पासलकर त्वरीत कामाला लागले. त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले. चित्रीकरणात रिक्षाचालकाचा वाहन क्रमांक मिळाला. पासलकर यांनी तातडीने वाहन क्रमांकावरुन रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि रिक्षाचालकाला महाडिक यांची पिशवी परत आणून देण्यास सांगितले.
रिक्षाचालक पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने दागिने ठेवलेली पिशवी पोलिसांना दिली. पोलिसांनी महाडिक यांच्यासमोर पिशवी उघडली असता महाडिक यांचे सात तोळ्यांचे दागिने पिशवीत सुरक्षित असल्याचे आढळले. दागिने परत मिळाल्यानंतर महाडिक यांच्या डोळ्यांत आनंदाश्रृ तरळले.
पोलीस आयुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी महाडिक यांना दागिने परत केले. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक फौजदार मोरे, हवालदार पासलकर यावेळी उपस्थित होते. महिलेचे दागिने परत मिळवून दिल्याने पोलीस उपायुक्त गिल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.