पुणे : शहरातील निधीच्या उपलब्धतेमुळे रखडलेल्या सीमाभिंतींचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि ओढ्यांलगत सीमाभिंती उभारण्यासाठी राज्य शासनाने २०० कोटी रुपयांचा विशेष निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे शहरातील विशेषत: आंबिल ओढ्यालगतच्या परिसराला याचा मोठा फायदा होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ओढ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या महापूराने शहराच्या दक्षिण भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पूरामध्ये ओढ्यालगतच्या अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या होत्या. या सीमाभिंती खासगी जागेत असल्याने त्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास महापालिकेने नकार दिला होता. मात्र, तेव्हापासून सीमाभिंतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
दरम्यान, येथील सीमाभिंती महापालिकेने स्वखर्चाने बांधाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. सीमाभिंती उभारण्यासाठी राज्य शासनाकडे निधी मागण्याचा प्रस्तावावरही चर्चा झाली होती. माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार राज्य शासनाने २०० कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून सीमाभिंती उभारण्यास दिला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये महापालिकेला मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण किंवा सीमाभिंती उभारल्या जाणार आहेत. सीमाभिंतीमुळे पूर परिस्थितीतही पाणी प्रवाही राहण्यास मदत होईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तसेच महापालिकाल विशेष बाब म्हणून हा निधी मंजूर झाल्याने खासगी जागेतील सीमाभिंतींची कामे तसेच शासकीय जागांवरील सीमाभिंतींची कामेही करता येणार आहेत.
दरम्यान, निधी मंजूर झाला असला तरी अद्यापही तो महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सीमाभिंतीची कामे केली जातील. आगामी पावसाळ्याच्या तोंडावर प्राधान्यक्रमाने सीमाभिंतीची कामे केली जातील, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.