शिरूर : शिरूरमध्ये फायरिंग करून तसेच गावठी पिस्तुल जवळ बाळगुन दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील सराईत गुंड जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. वैभव नितीन भोईनल्लु (वय २४ वर्षे, रा. कामाठीपुरा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) असं अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुंडाचा नाव आहे.
ही कारवाई शिरूर येथील इदगाह मैदान परिसरातून शनिवारी (दि. १४) साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. आरोपीला आज (दि. १५) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
बेकायदेशिर गर्दी जमाव जमवुन शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी तसेच हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, प्राणघातक हत्याराने दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, खुन करण्याचा प्रयत्न करणे, साथीदारांना खुन करण्याचा प्रयत्न करण्याकरीता चिथावणी देणे, अग्नीशस्त्रे जवळ बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकुण ५ गुन्हे २०१९ ते २०२४ या कालावधीत दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील व शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्याकरीता पोलीस अधिक्षक यांच्या सूचनेनुसार हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणारे, वाळू तस्कर आणि काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या कृत्यांना आळा घालणेबाबत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगीतला होता.
त्यानुसार पोलीस निरीक्षक केंजळे यांनी प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केला होता. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्याधिकाऱ्यानी वैभव भोईनल्लु याला स्थानबध्द करण्याबाबत १३ डिसेंबर रोजी आदेश दिले होते.
त्यानुसार शिरूर पोलीसांनी आरोपीचा शोध घेवुन १४ डिसेंबर रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास इदगाह मैदान परिसरातून ताब्यात घेवुन १५ डिसेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजता अमरावती जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द केले. दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्याने एका वर्षात ३ सराईतांना स्थानबध्द करून गुन्हेगांराना इशारा दिला असुन यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगीतले आहे.