पुणे : कॅम्पमधील सराईत गुन्हेगाराला शनिवारी (ता. १३) पहाटे संपवण्यात आले. यामागील नेमके कारण आता उघडकीला आले आहे. एकाच्या बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्याने कट रचून अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) या सराईत गुन्हेगाराला संपवण्यात आले आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर खुनामागचे खरे कारण समोर आले आहे.
याप्रकरणी फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालीमजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे किमान २५ गुन्हे समर्थ व खडक पोलीस ठाण्यात दाखल होते. भवानी पेठ आणि कॅम्प भागातील विक्रेत्यांवर तो दादागिरी करीत असे. आई बहिणीवरुन शिवीगाळ, मारहाण करुन खिशातील पैसे काढून घेणे, सतत संपवून टाकण्याची धमकी देणे, असे प्रकार सराईत गुन्हेगार सातत्याने करत होता. गाड्यांवर मोफत खाणे, विक्रेत्यांकडील वस्तू जबरदस्तीने उचलून नेणे असे प्रकार देखील तो करत असे. त्याच्या दादागिरीमुळे परिसरातील लोक वैतागले होते. पोलीस आयुक्तांनी शेख याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.
दरम्यान, सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने एका महिलेची छेड काढली होती. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी कट रचला. त्याला मध्यरात्रीनंतर ताबुत स्ट्रिट येथे बोलावले. यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा आरोपींनी धारधार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, पोटावर, छातीवर व हनुवटीवर सपासप वार करुन त्यांचा खून केला.
लष्कर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर त्यात आरोपी कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके पुढील तपास करीत आहेत.