पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या श्वानाच्या पायाला दोरी बांधून त्याला फरपटत नेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी लोहगाव रस्त्यावर वाघोली कैलास फर्निचर शॉपजवळ घडली आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून खांदवे नावाच्या एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी संस्थेत काम करते. त्यांच्या बहिणीने त्यांना एक व्हीडीओ पाठवला होता. त्यामध्ये दोन तरुण एका काळ्या रंगाच्या जिवंत श्वानाला त्रास देत असल्याचे निदर्शनास आले. या श्वानाला दोरीने बांधलेले असून, त्याला रस्त्यावरून फरपटत ओढत नेत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसत होते. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. या घडलेल्या घटनेबाबत संबंधितांना जाब विचारायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्तीला शिवीगाळ करण्यात आली आहे.
आरोपीने, त्या श्वानाला १०० मीटरपर्यंत रस्त्याने फरपटत नेले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच मृत अवस्थेतील श्वानाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचराकुंडीजवळ नेऊन टाकण्यात आले आहे. फिर्यादी यांनी कचराकुंडी जवळ जाऊन पाहिले असता श्वानाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत होता. तसेच त्याचा उग्र वास देखील येत होता.
दरम्यान, फिर्यादी यांनी श्वानाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने ‘मीच दोन कामगारांना श्वान आजारी असल्याचे सांगून त्याला लांब टाकण्यास सांगितले होते, अशी कबुली दिली. त्याने हे प्रकरण ‘तुम्ही पुढे वाढवू नका. येथेच मिटवून घ्या. मी पैसे देतो’ असे आमिष देखील आरोपीने दाखविले. याविषयी तक्रार करणार असल्याचे सांगताच त्याने बाचाबाची करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास विमाननगर पोलीस करीत आहेत.