पुणे : महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटना आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने 16 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारणार होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्टाईने तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या समय सूचकतेने साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्रिपक्षीय समिती गठीत करून साखर कामगारांच्या पगारवाढीचे दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे.
साखर कामगारांचा बेमुदत संप मागे…
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने राज्यातील साखर कामगारांच्या वेतन मंडळाची मुदत दिनांक 31 मार्च 20 24 रोजी संपल्यामुळे शासकीय दरबारी सर्व पत्र व्यवहार करून सुद्धा साखर कामगारांची पगार वाढ करण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत होत नव्हती. 31मार्च 2024 नंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळे गेली आठ महिन्यापासून त्रिपक्षीय समिती गठीत करून राज्यातील साखर कामगारांची पगार वाढ, थकीत वेतन, किमान वेतन असे अनेक महत्त्वाचे 35 प्रश्न घेऊन साखर कामगारांच्या संघटना राज्यभर इशारा मोर्चे, मीटिंग , शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर वेळोवेळी बैठका असे अनेक कार्यक्रम करून गेले आठ महिन्यापासून राज्य संघटनेचे पदाधिकारी पाठपुरावा करत होते. परंतु, त्याला यश येत नव्हते, त्यामुळे नाईलाजाने येणाऱ्या 16 डिसेंबर 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा साखर कामगारांनी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेमार्फत दिलेला होता. याबाबत अनेक जिल्ह्यांचे दौरे सुद्धा चालू झाले होते.
या दरम्यान विधानसभा निवडणुकीचे कामकाज चालू होते. त्यामुळे सर्व अडीअडचणींना सर्वांनाच सामोरे जावे लागत होते. परंतु, यातून मार्ग काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कामगारांची सद्यस्थिती व उशिरा चालू झालेल्या साखर कारखान्याची सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्वरित महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर शिष्टाई करून शासकीय पातळीवरून साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करून राज्यातील साखर कामगारांना त्वरित न्याय देण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याचे आदेश पारित केले. तसेच त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर, दत्तात्रेय निमसे अशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील साखर कामगार प्रतिनिधींना सूचना देऊन 16 डिसेंबर 2024 रोजी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाकडे जातीने लक्ष देऊन संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्वरित निर्णय घेतला त्यामुळे तमाम राज्यातील साखर कामगारांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शतशः आभारी आहे. तसेच साखर आयुक्त, कामगार आयुक्त व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ अध्यक्ष पी. आर. पाटील साहेब यांनी सुद्धा या कामी मोलाचे सहकार्य केलेले आहे तसेच सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनीही मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार.
राजेंद्र तावरे, सचिव महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ