पुणे : पुणे शहरातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. फडणवीस आज थेट पुणे पोलिस आयुक्तालयात पोहोचले असून त्यांनी आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. ते म्हणाले ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
गृहमंत्र्यांनी आज पुण्यात पोलिस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय तपास झाला, पुढची कार्यवाही काय आणि यापुढे अशा घटना घडू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. मात्र, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला, असे फडणवीस म्हणाले.
पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्यायाधीकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते. त्यांनी फेरविचार केला नाही, तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार, ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधीकरण फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दारु पिऊन लोकांचे जीव घेण्याचा अधिकार नाही : देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना म्हणाले, कोणालाही दारु पिऊन, बिनानंबरची गाडी चालविण्याचा आणि लोकांचे जीव घेण्याचा अधिकार नाही. तसेच बारचे जे परवाने देण्यात आले आहेत, त्या परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. जे अटींचे पालन करत नसतील, ते बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहीम नियमितपणे राबवावी
फडणवीस म्हणाले, नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहीम नियमितपणे राबवण्यात यावी, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनी सुद्धा स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार याप्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल, तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला.