पुणे : पती पत्नीचे भांडणं होत असतात, ते नंतर आपापसात मिटवली सुद्धा जातात. कधी भांडणाची कारणं किरकोळ असतात तर काही एकदमच टोकाची. परंतु पुण्यात पती पत्नीच्या भांडणाचं कारण भुवया उंचावणारं आहे. मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत घडली आहे. पत्नीने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांड घातले, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख तोडलेया आहे. याबाबत पतीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीसाठी हरभरे भिजवले होते. रविवारी (१ डिसेंबर) भिजवलेले हरभरे न खाल्ल्याने दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात लाटणे मारले. लाटण्याचा मारापासून वाचण्यासाठी पतीने दोन्ही हात वर केले. तेव्हा पत्नीने त्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले. त्यानंतर पत्नीने पतीच्या करंगळीचा चावा घेऊन नख सुद्धा तोडले. मारहाणीत जखमी झालेल्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ४० वर्षीय पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार परीट तपास करत आहेत.