पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. त्यात प्रचार करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. पुण्यात असाच एक फंडा एका हॉटेल मालकाला चांगलाच महागात पडला आहे. हॉटेलच्या टेरसवर एअर बलून लावल्यानं आचार संहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेवत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अरुण पवार असे हॉटेल मालकाचे नाव आहे.
निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोग सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहे. यासाठी भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसुन येतं. त्यामुळे जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच दरम्यान पुण्यात एका हॉटेल मालकाने एअर लावून आचार संहितेचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील एका हॉटेलवर एकाने हॉटेलच्या छतावर एअर बलून लावला होता. मात्र या बलूनवर विनापरवाना उमेदवाराचा फोटो लावण्यात आला होता. याप्रकरणी शेखर अमरदीप कांबळे (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हॉटेलच्या टेरसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या नावाचा एअर बलून लावल्यानेत आचारसंहितेचा भंग झाल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजच्या टेरेसवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलून बांधलेला आहे. त्यावरून मालकावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस आर मोरे, व्हिडिओग्राफर एस ए आडाळगे हे तेथे पोहचले. टेरसवर एअर बलून बांधलेला दिसून आला.
लॉजचे मालक अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. एअर बलूनविषयी परवानगी घेतली आहे का? याची विचारपूस केल्यानंतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र अजून परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आलं. त्यांनी आचारसंहिता कक्षाकडे चौकशी केल्यावर बलुनला कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.