राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : जुन्नर नगरपालिका हद्दीतील बेघर लोकांना गेली ४० वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा आहे. बेघरांना घरकुल मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मातृभूमी बेघर आघाडी संघटना, प्रहार बेघर महिला संघटना व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राच्या वतीने आंदोलन, मोर्चा, उपोषण करण्यात आले. अनेकदा नगरपालिका, नगराध्यक्ष, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, मंत्रालय, आमदार, खासदार यांच्याशी पत्र व्यवहार केले. समक्ष भेट घेऊन चर्चा केली; मात्र, परिस्थिती आजही कायम आहे. नेतेमंडळी निवडणूक जवळ आल्यावर आश्वासने देतात; मात्र, प्रश्न सुटत नाही. याप्रश्नी जुन्नर नगरपालिकेतर्फे बैठकीचे आयोजन केले होते.
या वेळी आर.पी.आय.चे पोपट राक्षे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, प्रहार बेघर महिला संघटना व श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अरूण शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरातील घरकुलांबाबत जुन्नर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी संदीप भोळे, मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या वेळी पंचलिग झोपडपट्टी, रोकडे मारूती झोपडपट्टी व बेघर महिला ग्रूप यांनी, मागील ४० वर्षांपासून घरकुलासाठी लढत असल्याचे सांगून, घरकुल कधी मिळणार, अशी विचारणा केली. पंचलिंग झोपडपट्टीत पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शौचालयाचे नळ दुरूस्ती, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याने नागरिक आक्रमक झाले. या वेळी संभाजी साळवे यांनी घरकुलाच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
प्रहार संघटनेचे दीपक चव्हाण यांनी नगरपालिकेकडून पत्रव्यवहार केल्यावर संघटनेला कोणत्याही पत्राचे उत्तर दिले जात नाही, याकडे लक्ष वेधले. जुन्नर शहरातील सर्व बेघरांना लवकर घरकुल द्यावे व जुन्नर नगरपालिका हद्दीतील सर्व बेघर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन घरकुल देण्याची मागणी केली.
या वेळी जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सविस्तर माहिती दिली. झोपडपट्टीतील स्वच्छता, वीज, पाणी, रस्ते याबद्दल सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने सर्व सुविधा देण्याचा आदेश दिला व लवकरच बेघर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन घरकुलाचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती दिली. बेघरांना घरकुलासाठी बिल्डर, सर्व नॅशनल बॅंकांचे मॅनेजर व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी पोपट राक्षे यांनी मुख्याधिकारी व उपस्थित बेघर महिला व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या वेळी आर.पी.आय.चे संभाजी साळवे, अध्यक्ष पोपट राक्षे, उपाध्यक्ष सुरेश खरात, युवा अध्यक्ष प्रवीण लोखंडे, तारा वंजारी, सुमन वायकर, बेबी जाधव, प्रहार बेघर संघटना व श्री राधेश्यामचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्षा रजनी शहा, शमिम सय्यद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.