पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत काल रविवारी (दि. ०१) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करून कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेत आंदेकर यांच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडल्या. उपचारदरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील नाना पेठेतील डोके तालीम परिसरात ही घटना घडली आहे
दरम्यान, याच घटनेमुळे विरोधकांनी राज्य सरकावर घणाघात केला आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. एक्स या माध्यमावर ट्विट करत जयंत पाटील यांनी एक पोस्ट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होत आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल जयंत पाटलांनी राज्य सरकारला केला आहे.
पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 2, 2024