पुणे : वाहन चोरी, घरफोडी करणाऱ्या व दीड वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनच्या पथकाने अखेर अटक केली आहे. अटक आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. मागील १६ महिन्यांपासून तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुन्हे शाखेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आदित्य मयुर जाधव (रा. दत्त मंदिरासमोर, कुंजीर वस्ती, मांजरी बु., पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस हवालदार मनोज खरपुडे यांना माहिती मिळाली की, दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी आदित्य जाधव हा त्याच्या घरी आला आहे. यावरुन पथकाने आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता, त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) २ सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार खरपुडे, लोखंडे, सपकाळ, सरतापे, येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.