राहुलकुमार अवचट
यवत – गोमंत साई सेवक यांच्या वतीने श्री राष्ट्रोळी साई मंदिर , सांगोल्डा, बार्देश गोवा येथुन दरवर्षी गोवा ते श्री क्षेत्र शिर्डी असा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. ज्या कालावधीत महाराष्ट्र , देश व जगातील अनेक तरुण गोव्याची वाट धरतात त्याकाळात गोव्यातील अनेक तरुण साईंच्या दर्शनाची आस घेऊन पायी शिर्डीकडे जात असल्याने कौतुक होत आहे.
श्री साई पालखीचे दौंड तालुक्यात श्री साईचरण सेवा मंडळ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. काल माध्यांन्ह आरतीसाठी पालखी देऊळगावगाडा येथील हॉटेल आमन ढाबा येथे विसावला. यावेळी श्री साईंच्या पालखी सह पादुकांची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
माध्यांन्ह आरती नंतर साईसेवकांनी महाप्रसाद लाभ घेऊन विश्रांती नंतर पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामासाठी यवत येथील श्री तुकाईमाता मंदिर येथे विसावला. त्यानंतर आज पहाटे ०६ च्या सुमारास श्री साई दर्शनाची आतुरता असलेले जवळपास १४० साईसेवकांनी शिरुरमार्गे श्री क्षेत्र शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले.
दरम्यान, ०५ जानेवारी रोजी गोवा येथून निघालेले पदयात्री जवळपास ६५० कि.मी अंतर असलेला पालखी सोहळा २० जानेवारी रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार असुन पालखी सोहळ्यात गोवा राज्यातील अनेक भागातील साईसेवक सहभागी असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी श्री साईभक्त सनी शहा , गणेश राजपुत, दिपक चोरगे, शिवा कदम, पद्मा पवार , हॉटेल आमन चे मालक बाबा शेख यांसह दौंड तालुक्यातील अनेक साईभक्त उपस्थित होते.